नवी दिल्ली :  indiavschina भारत- चीनदरम्यान सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय सैन्याला सीमा भागात दिल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्र वापराच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. चीनसोबत लागून असणाऱ्या एलएसी म्हणजेच लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलपाशी अतिशय अटीतटीच्या प्रसंगी गरज भासल्यास गोळीबार आणि शस्त्रास्त्रांचा वापर करण्याची मुभा भारतीय लष्कराला देण्यात आली आहे. रविवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गरज भासल्यास चीनला जशास तसं उत्तर देण्याची मुभा सैन्याला दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच सीमाभागात तणावाच्या परिस्थितीनं गंभीर वळण गेल्यास सैन्याला परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पूर्ण सूट देण्यात आल्याचं सांगितलं होतं.


दरम्यान, यापूर्वी १९९६ आणि २००५ या वर्षांमध्ये करण्यात आलेल्या करारांनुसार कोणत्याही देशाला कोणावरही बेछूट गोळीबार करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. शिवाय एलएसीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर कोणत्याही प्रकारच्या स्फोटकांचा वापर न करण्याची अटही दोन्ही राष्ट्रांनी म्हणजे भारत आणि चीननं मान्य केली होती. पण, आता मात्र दशकभरापूर्वीचं हे चित्र पुरतं बदललं आहे. 


 


साधारण आठवडाभरापूर्वी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये हिंसक झडप झाली होती. ज्यांमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यातील जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली. चीनच्या सैन्यानं भारतीय सैन्यातील जवानांवर दगड, खिळे असणारे लोखंडी रॉड अशा साहित्याचा वापर करत हल्ला केल्याची धक्कादायक माहितीली उघड झाली. ज्यानंतर या प्रकरणाला तणावाचं वळण मिळालं. याच धर्तीवर भारत- चीन संबंधांमध्ये पुन्हा एकदा मीठाचा खडा पडला. ज्याचे परिणाम दिसण्यास आता सुरुवात झाली आहे.