पाटणा: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरु आहे. मात्र, या प्रचारादरम्यान अनेकदा लोकांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे किंवा अन्य काही कारणांनी नेत्यांची फजिती झाल्याचेही प्रकार समोर येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावरही गुरुवारी अशीच परिस्थिती वेळ ओढावली. ते पुर्णिया येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचा उल्लेख केला. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी वर्गाला खूश करण्यासाठी मोदी सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या उपक्रमातंर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. हे पैसे तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार असून यंदाच्या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, निवडणुकांचा हंगाम लक्षात घेता सरकारने गेल्या आर्थिक वर्षातच पूर्वलक्ष्यी प्रभावाने शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता देऊन केला होता. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी मोठ्या जोशात उपस्थित शेतकऱ्यांना तुम्हाला २ हजार रुपये मिळाले का, असा प्रश्न विचारला. त्यावर शेतकऱ्यांनी एकसुरात चक्क नाही म्हटले. त्यामुळे राजनाथ सिंह यांची गोची झाली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरीही राजनाथ सिंह यांनी आपली बाजू सावरण्यासाठी ज्यांना पैसे मिळाले त्यांनी हात वर करा, असा प्रश्न विचारला. मात्र, एकच प्रश्न वारंवार विचारूनही शेतकरी आपल्या उत्तरावर ठाम राहिले. तेव्हा राजनाथ सिंह यांनी व्यासपीठावरील स्थानिक नेत्यांकडे पाहिले. मात्र, शेतकऱ्यांचा ठामपणा पाहून हे नेतेही फार काही करु शकले नाहीत. शेतकऱ्यांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे राजनाथ सिंह यांची चांगलीच कोंडी झाली.