बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊ - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
हैदराबादमधल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद
नवी दिल्ली : हैदराबादमधल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद उमटले. बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल, असं आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे. हैदराबाद ते दिल्ली आणि सिलीगुड़ी ते जालंधरपर्यंत एकच मागणी, बलात्काऱ्यांना फाशी द्या. आक्रोशाची ही धग संसदेपर्यंतही पोहोचली. बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊ, अशी घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, 'हे कृत्य अमानवीय आहे. सरकार यावर चर्चेसाठी तयार आहे. अशा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी संसदेत सहमती होत असेल तर त्यावर सरकार तरतूद करायला तयार आहे.' संसदेच्या दोन्ही सभागृहातील भाजप, सपा, काँग्रेस, टीएमसीसह सर्व पक्षाच्या नेत्यांनी यावर आपला रोष व्यक्त केला.
दिल्लीपासून गल्लीपर्यंत आजही अनेक मुली वासनांच्या शिकार होत आहेत. हैवानांकडून अक्षरशः कुस्करल्या जात आहेत. बलात्काराविरोधात कितीही कठोर कायदे झाले तरी आजही बलात्कार करायला नराधम धजावतायत, याचाच अर्थ अजूनही म्हणावी तशी जरब बसलेली नाही.
राज्यसभेचे सभापती वैंकेया नायडू यांनी म्हटलं की, 'फक्त कायद्यांनी काही नाही होणार, आधीच अनेक कडक कायदे आहेत. यासाठी राजकारण सोडून एकत्र येऊन काम केलं पाहिजे. वयाचा कृत्याशी काय संबंध आहे. दया याचिकेवर ही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणात ट्रायलची संधी असते मग दया याचिका का असली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं.'