डोकलाम मुद्दयावर लवकरच तोडगा निघणार- राजनाथ सिंह
डोकलामप्रश्नावर देशाचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
नवी दिल्ली : डोकलामप्रश्नावरुन भारत आणि चीनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व प्रश्न निष्फळ ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. डोकलाम मुद्यावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.
'भारताला कोणत्याही प्रकारचा संघर्ष करायचा नसून, शांतता हवी असल्याने डोकलाम मुद्द्यावर लवकरच तोडगा निघालेला पहायला मिळेल', असं राजनाथ सिंह बोलले आहेत. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना राजनाथ बोलत होते. 'चीनदेखील सकारात्मक पाऊल उचलत तोडगा काढण्यासाठी मदत करेल', असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.
शेजाऱ्यांशी चांगले संबंध महत्त्वाचे
पुढे बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, 'आपण आपल्या आयुष्यातील मित्र बदलू शकतो, पण शेजारी बदलू शकत नाही. त्यामुळे आपल्या शेजा-यांसोबत चांगले संबंध असणं खूप महत्वाचं आहे'.
जवानांचे कौतुक
राजनाथ सिंह यांनी यावेळी भारतीय जवानांचे कौतुक केले. शांतता राहावी यावर जोर दिला असला तरी आपले सैनिक भ्याड नसल्याचे त्यांनी सांगितले. राजनाथ सिंग यांनी यावेळी आपल्या लदाख दौऱ्याची माहिती दिली. इतक्या कडक थंडीतही जवान कशाचीही पर्वा न करता खंबीरपणे उभे होते असं राजनात सिंह यांनी सांगितले.