नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामातील अवंतीपोराजवळ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह शुक्रवारी त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी दुपारी बडगाममधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) मुख्यालयात जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी जवानांचे मृतदेह असलेल्या शवपेटीला खांदा दिला. यावेळी जम्मू-काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक, लष्कराच्या उत्तर मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह त्यांच्यासोबत उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी यावेळी काश्मीरमधील परिस्थितीचाही आढावा घेतला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांवर अंत्यसंस्कार करण्यावेळी सीआरपीएफचे उपमहासंचालक किंवा कमांडंट स्तरावरील अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान राजनाथ सिंह शनिवारी नवी दिल्लीला पोहोचल्यावर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात येणार आहे. पुलावामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात येणार आहे. बैठकीत काश्मीरमधील सद्यःस्थिती आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय याबद्दल सर्व पक्षाच्या नेत्यांना माहिती देण्यात येणार आहे. केंद्र सरकार पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना कशाप्रकारे उत्तर देणार, याची माहिती या बैठकीत देण्यात येईल.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याची कडव्या शब्दांत निंदा केली. दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आता त्यांना याची शिक्षा भोगावीच लागेल, असे मोदी यांनी म्हटले आहे. 
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने पुलवामामधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.