वसईत बिबट्यानंतर राजू वाघाची दहशत, चोरट्यांनीही घेतला धसका
वसईत राजू वाघाची डरकाळी...व्हिडीओ पाहून तुमच्या काळजात भरेल धडकी
प्रथमेश तावडे, झी मीडिया वसई : मुंबईतल्या आरे कॉलनीत बिबट्यानं दहशत माजवलेली असतानाच आता वसईत एका वाघाची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात या वाघाची सामान्य लोकांना अजिबात भीती वाटत नाही. चोरट्यांनी आणि भटक्या कुत्र्यांनी मात्र त्याचा चांगलाच धसका घेतला आहे.
वसईतला हाच तो राजू वाघ आहे ज्याला काही जण पाहून घाबरत आहेत तर काही जणांना हसू आवरेनासं झालं आहे. हा काही खराखुरा वाघ नाही तर हा आहे राजू कुत्रा. काही लोकांनी त्याला वाघासारखं रंगवलं आणि याच कुत्र्याचा राजू वाघ झाला. सुरूवातीला राजू कुत्र्याला पाहून लोक घाबरायचे. मग हा एक कुत्रा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
स्थानिकांची भीती केव्हाच पळून गेली आहे. चोरट्यांनी आणि भटक्या कुत्र्यांनी मात्र राजूचा चांगलाच धसका घेतला आहे. सध्या वसई शहरात ज्याच्या त्याच्या तोंडी राजूचीच चर्चा रंगताना दिसते आहे. राजूला पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येत आहेत. कुत्रा असला तरी काही दिवसांपुरता का होईना राजू वाघासारखं जगतोय हीच मोठी गंमत आहे.