नवी दिल्ली: राज्यसभेत रविवारी खासदारांकडून घालण्यात आलेला गोंधळ आणि उपसभापतींशी नियमबाह्य वर्तनामुळे संसदेच्या प्रतिमेला काळिमा फासला गेल्याची चर्चा असतानाच मंगळवारी सकाळी एक आशादायक चित्र पाहायला मिळाले. राज्यसभेत घातलेल्या गोंधळप्रकरणी सोमवारी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. या खासदारांनी अध्यक्षांच्या  निर्णयाचा विरोध करत संसदेबाहेर असणाऱ्या गांधी पुतळ्यासमोर आंदोलनाला सुरुवात केली होती. काल रात्रभर हे आंदोलन गांधी पुतळ्यासमोरच झोपले होते. यानंतर आज सकाळी उभसभापतीच या खासदारांसाठी चहा घेऊन आले. हे चित्र पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई



रविवारी राज्यसभेत दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली तेव्हा सभागृहाची सूत्रे उपसभापती हरिवंश नारायण यांच्याकडे होती. त्यांनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येत गोंधळ घातला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तर उपसभापती हरिवंश नारायण यांच्यासमोरील नियमपुस्तिका फाडली, तसेच माईकही उखाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज्यसभेतील वातावरण प्रचंड तापले होते. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी संबंधित खासदारांची ही कृती निषेधार्ह आणि संसदेच्या प्रतिमेला काळिमा फासणारी असल्याची टीका केली होती. त्यामुळे साहजिकच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणावाचे वातावरण होते. 


मोदी सरकारला मोठे यश; अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी

मात्र, आज थेट उपसभापती हरिवंश नारायण मनात कोणतीही कटुता न ठेवता निलंबित खासदारांसाठी चहा घेऊन आले. गेल्या काही वर्षांतील देशातील अत्यंत टोकाचे राजकारण पाहता उपसभापतींची ही कृती निश्चित आश्वासक म्हणायला हवी.