राज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
अहमदाबाद : गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांना पराभूत करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केलेत.
तीन जागांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात असून या दोघांचाही विजय निश्चित मानला जात आहे. तर भाजपने पटेल यांच्याविरोधात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बलवंतसिंह राजपूत यांना मैदानात उतरवत या निवडणुकीत रंगत आणलेय.
आज साऱ्या देशाचं लक्ष गुजरात विधानसभेकडे लागले आहे. गुजरातमधील तीन जागासह आज देशात राज्यसभेच्या दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. या सर्वाधिक महत्वाची निवडणूक गुजरातमध्ये होतेय. काँग्रेसचे चाणाक्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अहमद पटेल यांची या निवडणुकीत खरी परीक्षा आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्या ६ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत.
दरम्यान, ६ आमदार फुटल्याने आणखी आमदार फुटू नये म्हणून काँग्रेसने योग्य ती खबरदारी घेत ४४ आमदारांना कर्नाटकमधील बंगळुरु येथील हॉटेलवर ठेवले होते. त्यांना काल सायंकाळी गुजरातमध्ये आणण्यात आले. आज होणाऱ्या निवडणुकीत ते काय भूमिका बजावतात यावरच पटेल यांची भवितव्य अवलंबून आहे.