...म्हणून राज्यसभेतील `मार्शल`चा गणवेश पुन्हा बदलला
सभापतींच्या आसनाशेजारी उभे असणारे हे....
नवी दिल्ली : मागील आठवड्यामध्ये संसदेच्या सत्रादरम्यान, राज्यसभेत सैन्यदलाप्रमाणे वेश परिधान केलेले मार्शल पाहायला मिळाले. पण, अखेर सदनात आणि सदनाबाहेरही त्यांच्या वेशावरुन प्रकाशात आलेला वादाचा मुद्दा पाहता अखेर या मार्शलचा गणवेश बदलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी हे मार्शल अखेर बदललेल्या रुपात दिसले.
सध्या सुरु असणाऱ्या संसदीय सत्रादरम्यान पहिल्याच दिवशी सभापतींच्या आसनाशेजारी उभे असणारे हे मार्शल गडद निळ्या रंगाच्या सैन्यदलाप्रमाणे दिसणाऱ्या गणवेशात पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या डोक्यावर सैन्यदल अधिकाऱ्यांप्रमाणेच टोपीही पाहायला मिळाली. हीच बाब हेरत चहूबाजूंनी मार्शलच्या गणवेशावर टीका झाल्याचंही पाहायला मिळाली. ज्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी मार्शलचा वेश बदलला जाण्याचे संकेत दिले.
कोणी दर्शवली होती हरकत?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सत्रात कामकाज सुरू झाल्यानंतर मार्शल सैन्यदलाप्रमाणे असणाऱ्या वेशात दिसले. ज्यानंतर सदनाबाहेर सैन्यदल अधिकाऱ्यांनी यावर हरकत व्यक्त केली. दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू होताच, सभापती नायडू यांनी याविषयीची पुनर्विचारासाठी हे प्रकरण राज्यसभेच्या सचिवालयाकडे पाठवलं. सभापतींच्या या घोषणेनंतर सदनाकडून समाधानही व्यक्त करण्यात आलं.
माजी सैन्यदलप्रमुख व्ही.पी. मलिक यांनी सैन्यदलाच्या सेवेत नसलणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने तसा प्रकारच्या गणवेशाची नक्कल करत तो परिधान करणं हे बेकायदेशीर आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली होती.
सहसा असा असतो वेश...
सर्वसाधारणपणे राज्यसभेत सभापती, उपसभापती यांच्या मदतीसाठी असणारे मार्शल हे सफेद कपड्यांमध्ये कलगीदार पगडीमध्ये दिसतात. तर, शीतकालीन सत्रांदरम्यान ते बंदगळ्याच्या सफारीवजा शर्ट-पँटमध्ये दिसतात. सदनात सभापती येताच पुकार देण्यापासून त्यांचं काम सुरु होतं.
दरम्यान, गणवेशाच्या मुद्द्यावरुन प्रकाशझोतात आलेल्या या मार्शलचा गणवेश आतापर्यंत तीन वेळा बदलण्यात आला आहे. पहिल्यांदा १९४७ आणि दुसऱ्यांदा १९५० मध्ये त्यांची वेशभूषा बदलण्यात आली होती.