राकेश अस्थानांविरोधात पाच नव्हे तर एकाच प्रकरणाची चौकशी; तीन महिन्यात चमत्कार
राकेश अस्थाना हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात.
नवी दिल्ली: केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाचे माजी संचालक आलोक वर्मा पदावरून दूर झाल्यानंतर विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधातील चौकशी प्रकरणे परस्पर निकालात काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी सीबीआयने राकेश अस्थाना यांच्याविरोधात सहा प्रकरणांची चौकशी सुरु असल्याचे सांगितले होते. मात्र, आता केवळ एकाच प्रकरणात अस्थाना यांची चौकशी सुरु असल्याची धक्कादायक माहिती 'द इंडियन एक्स्प्रेस'ने उजेडात आणली आहे.
मोईन कुरेशी प्रकरणातील संशयित साना सतिश बाबू याच्याकडून ३ कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाप्रकरणी अस्थाना यांची चौकशी सुरु आहे. याशिवाय, त्यांच्याविरुद्ध अन्य कोणतेही चौकशी प्रकरण प्रलंबित नसल्याचे सीबीआयने स्पष्ट केले. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील वादानंतर सरकारने या दोघांनाही २३ ऑक्टोबर रोजी रजेवर पाठवले होते. या दोघांनीही एकमेकांवर भ्रष्टाचार व चौकशीत हस्तक्षेप केल्याचे आरोप केले होते.
'अनिल अंबानींना वाचवण्यासाठी मोदींचा सीबीआयमध्ये हस्तक्षेप'
यानंतर सरकारने एम. नागेश्वर राव यांच्याकडे सीबीआयच्या संचालकपदाची तात्पुरती जबाबदारी दिली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली होती.
'अस्थाना यांनी पोलीस कल्याण निधीचा पैसा निवडणुकीसाठी भाजपला दिला'
राकेश अस्थाना हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. सुरतचे पोलीस आयुक्त असताना अस्थाना यांनी पोलीस कल्याण निधीचे २० कोटी रूपये भाजपला निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्याचा आरोप आहे. तसेच २०१२ मध्येही इशरत जहाँ प्रकरणाचा तपास करणारे आयपीएस अधिकारी सतीश वर्मा यांनीही अस्थाना यांच्याविरोधात न्यायालयाकडे तक्रार दाखल केली होती. इशरत जहाँ प्रकरणात अस्थाना अवैधरित्या हस्तक्षेप आणि सरकारला अनुकूल भूमिका घेत असल्याचे सतीश वर्मा यांनी म्हटले होते.