टाटा ग्रुपच्या `या` शेअरमध्ये राकेश झुनझुनवालांनी फक्त 5 दिवसात खेचला कोट्यवधींचा परतावा
भारतीय शेअर बाजारात राकेश झुनझुनवाला हे बिग बुल म्हणून ओळखले जातात. अनेक गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओला फॉलो करतात.
मुंबई: बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष असते, ते ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात ते शेअर चांगलेच तेजीत येतात. टाटा ग्रुपच्या अशाच एका शेअरने राकेश झुनझुनवाला यांना मोठा फायदा दिला आहे.
मागील काही सत्रांमध्ये शेअर बाजारात आलेल्या तेजीमध्ये काही स्टॉकदेखील तेजीत असल्याचे दिसून आले. टाटा ग्रुपच्या टायटन या कंपनीच्या शेअरने झुनझुनवाला यांना कोट्यवधींचा नफा दिला आहे. गेल्या काही दिवसातच झुनझुनवाला यांना 750 कोटींचा फायदा झाला आहे. मागील काही सत्रातच हा शेअर 2124 रुपयांवरून 2295 रुपयांवर पोहचला आहे.
एका वर्षात 40 टक्के परतावा
26 मे 2022 रोजी टायटनचा शेअर 2124 रुपयांवर ओपन झाला. त्यानंतर बाजारात सलग काही सत्रांमध्ये तेजी नोंदवली गेली. 31 मे रोजी हा शेअर वाढून 2295 रुपयांवर गेला. गेल्या पाच दिवसात शेअरमध्ये 175 रुपयांची तेजी नोंदवली गेली.मागील एका वर्षात या शेअरने 40 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 370 रुपयांचा परतावा दिला आहे.
मार्च 2022 तिमाहीतील शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनची 3.98 टक्के भागिदारी होती. तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 1.07 टक्क्यांची भागिदारी होती. अशाप्रकारे झुनझुनवाला परिवाराकडे टायटनची एकूण 5.05 टक्क्याची भागिदारी आहे.