भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार Rakesh Jhunjhunwala यांचं निधन
राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं आहे.
मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज आणि बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं आहे. वयाच्या 62 वर्षी त्यांचं निधन झालं आहे. त्यांना भारताचं वॉरेन बफेट म्हटलं जायचं. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. रविवारी सकाळी त्यांचं निधन झालं आहे. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय. आज सकाळी 6.45 वाजता रुग्णालयाने राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूची पुष्टी केलीये.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नुकतंच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केलं होतं.
राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातून पैसे कमावल्यानंतर बिग बुलने एअरलाइन क्षेत्रातही प्रवेश केला होता. त्यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि 7 ऑगस्टपासून कंपनीचं काम सुरू झालं. झुनझुनवाला यांनी आकासा नावाने एअरलाइन कंपनी उघडलीये.
या विमान कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र देखील मिळालं होतं. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे. आकासा एअरलाइन्स सुरू करण्याआधी त्यांनी पीएम मोदींचीही भेट घेतली होती.
गुंतवणूकीची सुरूवात कशी केली
राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या कॉलेजच्या जीवनापासूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. एकदा राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलेलं की, सुरुवातीला त्यांनी 100 डॉलरची गुंतवणूक केली होती. त्यावेळी सेन्सेक्स निर्देशांक 150 अंकांवर होता.
राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची टायटन कंपनीमध्ये 5.5 टक्के पार्टनरशीप होती. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये 26 जुलै 2022 मध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे 10 हजार 300 कोटींच्या घरात होते.
याशिवाय 'स्टार हेल्थ'मध्ये त्यांची 14.39 टक्के पार्टनरशिप होती. फोर्टीस हेल्थकेयरमध्ये 4.23 टक्के, कॅनरा बँकेत 1.96 टक्के आणि क्रिसीलमध्ये 2.92 टक्के इतकी त्यांची पार्टनरशिप असल्याची माहिती आहे.