आदिवासींसोबत राहिल्यामुळेच राम `मर्यादा पुरुषोत्तम` झाला- मोदी
रामाने एक राजपूत्र असताना अयोध्या सोडली. मात्र, अयोध्येत परतताना तो मर्यादा पुरूषोत्तम झाला होता.
नवी दिल्ली: श्रीरामाने वनवासाचा १४ वर्षांचा काळ आदिवासींसोबत व्यतीत केला. त्यामुळेच तो मर्यादा पुरुषोत्तम झाला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते मंगळवारी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलत होते. येथील खुंटी या आदिवासीबहुल विभागात ही सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला साद घालताना मोदींनी म्हटले की, १४ वर्षांच्या वनवासानंतर राम अयोध्येत परतला तेव्हा त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाऊ लागले. याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? कारण, वनवासात असताना आदिवासींनी रामाला संस्कृती शिकवली. रामाने एक राजपूत्र असताना अयोध्या सोडली. मात्र, अयोध्येत परतताना तो मर्यादा पुरूषोत्तम झाला होता. हे सर्व आदिवासींसोबत राहिल्याने शक्य झाले, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
झारखंडमध्ये ७ डिसेंबरला विधानसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे याचे पडसाद झारखंडमध्येही उमटणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
नरेंद्र मोदी यांनी मात्र झारखंडमध्ये भाजपला विजय मिळेल, असा दावा केला. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर झारखंडमधील जनतेला भाजपविषयी विश्वास वाटत असल्याचे दिसून आले. तसेच रघुवर दास यांच्या सरकारने झारखंडमधील नक्षली चळवळीचा कणा मोडून काढल्याचा दावाही मोदींनी यावेळी केला.