नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात तुरूंगात असलेला व सध्या पॅरोलवर जेल बाहेर असलेल्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला बनावट (डमी) ठरवणारी याचिका दाखल करण्यात आली होती. यामुळे जेलमध्ये असलेला राम रहीम खरा की खोटा? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली, यावेळी हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले.  
 
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सोमवारी बलात्काराचा दोषी आणि रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून एक महिन्यासाठी पॅरोलवर सुटलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला बनावट (डमी) ठरवणारी याचिका फेटाळून लावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती कर्मजीत सिंह म्हणाले की, हा चित्रपट नाही. तुम्ही फिक्शन फिल्म पाहिल्या सारखं दिसतंय.पॅरोलवर आलेला राम रहीम गायब कसा होऊ शकतो. हायकोर्ट अशा प्रकारच्या याचिकांसाठी नाहीए,असे म्हणत त्यांनी याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले.


डमी राम रहीम
उत्तर प्रदेशातील बागपत आश्रमात पोहोचलेला गुरमीत राम रहीम हा खरा नसून डमी आहे, अशी शंका याचिकाकर्त्यांनी याचिकेत उपस्थित केली होती. त्याचे हावभावही खऱ्या गुरमीत राम रहीम सिंगसारखे नाहीत. डुप्लिकेट राम रहीमची उंची एक इंच मोठी आहे. हाताची आणि पायाची बोटेही मोठी आहेत. डोळ्याचा आकार बदलला आहे. डोळ्याचा आकार लहान झाला आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले. जुने आणि नवे फोटो जुळवले जात आहेत. चंदीगड, पंचकुला आणि अंबाला येथील काही तथाकथित डेरा भक्तांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. 


 डेरा सच्चा सौदाचे प्रवक्ते जितेंद्र कुमार म्हणाले की, याचिका दाखल करणारे डेराचे अनुयायी नाहीत. डेराच्या अनुयायांची गुरुजींवर पूर्ण श्रद्धा आहे. हा सगळा खोडसाळपणाचा कट आहे. याची प्रशासनाने चौकशी करावी.