नोव्हेंबर महिन्यापासून राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात- सुब्रमण्यम स्वामी
सुब्रमण्यम स्वामी आपला वाढदिवस अयोध्येतच साजरा करणार आहेत.
नवी दिल्ली: येत्या नोव्हेंबर महिन्यापासून अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात अयोध्या खटला प्रलंबित आहे. मात्र, लवकरच न्यायालय अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या बाजूने कौल देईल, असा विश्वास सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केला.
श्रद्धा हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. हा हक्क कोणापासूनही हिरावून घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे रामाचा जन्म झाला आहे, तेथून त्याचे मंदिर हटवता येणार नाही, असे स्वामी यांनी म्हटले. सुब्रमण्यम स्वामी शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त अयोध्येत आले होते. सुब्रमण्यम स्वामी यांचा आज वाढदिवस असून ते आपला वाढदिवस अयोध्येतच साजरा करणार आहेत. याठिकाणी ते पूजा आणि हवन करणार असून संतांसमवेत वेळ व्यतीत करतील.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नुकतीच राम मंदिराची उभारणी वेगाने झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. तत्पूर्वी उद्धव यांनी अयोध्या दौरा करून मोदी सरकारवर दबाव निर्माण करायचा प्रयत्नही केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या खटला न्यायप्रविष्ट असेपर्यंत सरकार यासंदर्भात कोणताही निर्णय घेणार नाही, असे स्पष्ट केले होते.
राम मंदिर आणि पुतळ्यांच्या राजकारणामुळे भाजपचा पराभव- संजय काकडे
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना मध्यस्थीचा तोडगाही सुचवला होता. माक्ष, हा प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे सर्वांचे लक्ष पुन्हा न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. दरम्यान सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये तिहेरी तलाक आणि अनुच्छेद ३७० सारखे महत्त्वपूर्ण मुद्दे निकालात काढले आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीसाठीही सरकार वेगळी भूमिका घेणार का, हे पाहणेही औत्स्युकाचे ठरेल.