राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त आज ठरण्याची शक्यता, मोदी उपस्थित राहणार?
अयोध्येतल्या राम मंदिर निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची आज महत्त्वाची बैठक होत आहे.
अयोध्या : अयोध्येतल्या राम मंदिर निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची आज महत्त्वाची बैठक होत आहे. राम जन्मभूमीवर मंदिर निर्माणाची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे राम जन्मभूमीवर मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त आज ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑगस्ट भूमिपूजनाची संभाव्य तारीख असू शकते. मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावलं जाऊ शकतं, अशीही माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूमिपूजनासाठी बोलावलं, तर २०१४ लोकसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच अयोध्येला जातील.
राम मंदिर निर्माणाच्या बैठकीत भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण रुपरेखा तयार केली जाणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या इतर मान्यवरांची यादीही बनवली जाईल. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही भूमिपूजनाला आमंत्रण दिलं जाऊ शकतं, असं सांगितलं जातंय.
भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय टीम, देशातले प्रमुख साधू संत आणि अयोध्या आंदोलनाशी जोडले गेलेल्यांनाही आमंत्रण दिलं जाईल. याशिवाय अयोध्या आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनाही विशेष आमंत्रण दिलं जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
अयोध्येत गर्भगृहात राम मंदिर निर्माणाच्या कामासोबतच ६७ एकर क्षेत्रात राम मंदिर परिसराचंही काम सुरू करण्यात येणार आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर अयोध्येमध्ये शनिवारी ही दुसरी बैठक होणार आहे. ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर पहिली बैठक दिल्लीमध्ये झाली होती. आजच्या बैठकीमध्ये १५ ट्रस्टींपैकी १२ ट्रस्टी उपस्थित राहणार आहेत. तर ३ ट्रस्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील.
आजच्या बैठकीसाठी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, महासचिव चंपत राय, निर्माण समिती अध्यक्ष नृपेंद्र मिश्र, ट्रस्टी युगपुरुष परमानंद गिरी महाराज, ट्रस्टी विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र, डॉ. अनिल मिश्र. कामेश्वर चौपाल, महंत दिनेद्र दास, अपर सचिव गृह भारत सरकार नामित सदस्य ज्ञानेश कुमार, अपर मुख्य सचिव उत्तर प्रदेश नामित सदस्य अवनीश अवस्थी, अयोध्या जिल्हाधिकारी अनुजा कुमार झा या बैठकीत सामील होतील. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वरिष्ठ अधिवक्ता के पारासरन, स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज, स्वामी विश्वप्रसन्न तीर्थजी महाराज उपस्थित राहतील.