पाटणा: लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सध्या उपचारासाठी अतिदक्षता विभागात ICU हलवण्यात आले आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, रामविलास पासवान यांची प्रकृती खालावल्यामुळे चिराग पासवान यांना बिहारमध्ये जाणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर रामविलास पासवान यांचे सुपूत्र चिराग पासवान यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये चिराग यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात लोकांना वेळेवर धान्य उपलब्ध व्हावे म्हणून माझ्या वडिलांनी तेव्हा स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी स्वत:ची तपासणी केली नाही. त्यामुळे आज त्यांची प्रकृती इतकी बिघडली आहे. आज मी हे पत्र लिहित असताना, वडिलांना रोज आजाराशी लढताना पाहत आहे. एक मुलगा या नात्याने वडिलांना रुग्णालयात पाहून अतिशय अस्वस्थ वाटत आहे. वडिलांनी मला अनेकदा बिहारमध्ये जाण्यास सांगितले. मात्र, मुलगा या नात्याने वडिलांना आयसीयूमध्ये सोडून कुठेही जाणे माझ्यासाठी शक्य नाही. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मला त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे. नाहीतर तुम्हा सर्वांचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला माफ करू शकणार नाही, असे चिराग यांनी म्हटले आहे. 

बिहारमध्ये ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सर्व राजकीय पक्षांकडून बिहारमध्ये जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र, रामविलास पासवान यांच्यासारखा खंदा नेता रुग्णालयात असल्याने लोक जनशक्ती पक्षासमोर समस्या निर्माण झाली आहे.