`उद्धवना कायद्याबद्दल ज्ञान नाही, असं अडसूळही मान्य करतात`
`शिवसेनेची दलित विरोधी आणि मागस विरोधी मानसिकता जाहीर झाली`
नवी दिल्ली : शिवसेना दलितविरोधी आहे, असं म्हणत लोक जनशक्ती पार्टीचे (लोजपा) अध्यक्ष रामविलास पासवान यांनी शिवसेनेवर टीका केलीय. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती अत्याचार सुधार कायदा लोकसभेत संमत झाल्यानंतर 'सामना'च्या अग्रलेखात मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला होता. यावर बोलताना केंद्रीय मंत्री रामविलास पासवास यांनी 'शिवसेनेची दलित विरोधी आणि मागस विरोधी मानसिकता जाहीर झाल्याचं' म्हटलं.
अशी वक्तव्य करण्यापूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या खासदारांशी चर्चा करावी, असा सल्लाही यावेळी पासवान यांनी उद्धव ठाकरेंना दिला. यासंदर्भात आपण शिवसेनेचे अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी संपर्क साधला... अडसूळ हे अनुसूचित जातीशी संबंधित आहेत... तेही माझ्या मताशी आणि सरकारच्या निर्णयाशी सहमत आहेत. उद्धव ठाकरेंना या कायद्याविषयी ज्ञान नसावं, असं अडसूळ यांनीही मान्य केलं... असंही यावेळी पासवान यांनी म्हटलंय.
बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेल्या राज्यातील एक नेता असं म्हणतोय, हे दुर्देवी असल्याचंही पासवान यांनी म्हटलंय.