नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत नवनिर्वाचित सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. तसेच 'मोदी...मोदी' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा दिल्या. त्यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कॉंग्रेसकडे इशारा करत राहुल गांधी कुठे आहेत ? असा प्रश्न विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शाह, परिवहन मंत्री नितिन गडकरी, रसायन आणि उर्वरक मंत्री सदानंद गौडा, मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देखील शपथ घेतली. याआधी कार्यवाहक अध्यक्ष विरेंद्र कुमार यांनी पीठासीन अध्यक्षांच्या पॅनलची घोषणा केली. यामध्ये सुरेश, ब्रजभूषण शरण सिंह सहभागी आहेत. 



१७ व्या लोकसभा अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, ५ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. १९ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील. तीन तलाक विधेयकावरही नजर असणार असून, २६ जुलैपर्यंत अधिवेशन चालणार आहे.



समर्थ विरोधी पक्ष असणे ही लोकशाहीची अनिवार्य अट आहे. त्यामुळे विरोधकांनी संख्याबळाची चिंता सोडून अधिवेशनात जनकल्याणासाठी काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिले संसदीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. लोकसभा सभागृहात जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


यावेळी त्यांनी म्हटले की, जनतेने विरोधी पक्षांना कोणताही कौल दिलेला असो. मात्र, विरोधकांची भावना आणि त्यांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी मौल्यवान आहे. सभागृहात खासदार म्हणून बसल्यावर विरोधी पक्षापेक्षा निष्पक्षतेची भावना गरजेची आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी विभागणी करण्यापेक्षा निस्पृह भावनेने जनकल्याणाला प्राधान्य द्यावे. जेणेकरून येत्या पाच वर्षांमध्ये आपण संसदेची प्रतिष्ठा वाढवू, असे मोदींनी सांगितले.