चंद्रदर्शन झालं! आजपासून रमजानला सुरूवात
चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजानला सुरुवात झालीय.
मुंबई : चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजानला सुरुवात झालीय. रमजानच्या या पवित्र महिन्यात रोजे अर्थात उपवास पाळले जातात. मात्र यंदाचा रमजान मुस्लिम बांधवांसाठी परीक्षा घेणारा ठरणार आहे.
यावर्षी मुस्लिम बांधवाना 15.30 तासांपेक्षा अधिक काळ उपवास करावा लागणार आहे. कारण यंदा रमजानचं पर्व उन्हाळ्यात आलंय. त्यामुळे रमजानचा उपवास करण्या-या मुस्लिम बांधवांना सरासरी पहाटे ते संध्याकाळी सव्वा सात वाजेपर्यंत उपवास करावा लागणार आहे.
15 तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी रोजे करण्याचा योग तब्बल 34 वर्षांनंतर आलाय. याआधी 1983 साली जूनमध्ये रमजानचा महिना आला होता आणि तेव्हाही 15 तासांपेक्षा अधिक रोजे पाळावे लागले होते. सात वर्षाच्या बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत रोजा केला जातो. रमजानच्या निमित्ताने बाजारपेठाही फुलून गेल्या आहेत.