नवी दिल्ली : भारतीय राजकारणातील एक मोठे नेते केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं  निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीचं त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासवान यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं. पासवान यांचे पार्थिव सकाळी १० वाजता अंत्यदर्शनासाठी १२ जनपथ येथे आणले जाणार आहे. त्यानंतर २ वाजता त्यांचे पार्थिव पटना येथील जनशक्ती कार्यालयात ठेवलं जाईल. शनिवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



६० वर्षांनी गुरुजींना भेटले


रामविलास पासवान यांनी आपल्या आयुष्यात यशाच्या अनेक पायऱ्या सर केल्या. ६० वर्षाच्यानंतर ते आपल्या शिक्षकांना भेटले. ज्यांनी बाराखडी शिकवली होती. त्यांना भेटणं हा पासवान यांच्यासाठी भावूक क्षण होता. मी माझ्या गुरुच्या मुलाला नोकरी देऊ शकलो नाही याचं मला दु:ख असल्याचे ते म्हणाले.


१९६० मध्ये पहीलं लग्न 
१९८१ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी खुलासा केला की १९६० मध्ये राजकुमारी देवीसोबत त्यांचा पहीला विवाह झाला होता. त्यांना दोन मुलं देखील आहेत. पण त्यांचा घटस्फोट झाला. 


दुसरं लग्न
१९८३ मध्ये त्यांनी एअरहॉस्टेस आणि पंजाबी हिंदू परिवाराशी संबंधित असणाऱ्या रिना शर्मा यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचा मुलगा चिराग पासवान नेते होण्याआधी अभिनय क्षेत्रात होते.


पासवान हे बिहारच्या राजकारणातून ते देशाच्या राजकारणात गेले. सध्या मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री देखील होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर त्यांचं आज निधन झालं आहे. 



रामविलास पासवान हे देशातील एक अनुभवी नेते होते. ५ दशकाहून अधिक त्यांच्याकडे राजकारणाचा अनुभव होता. ९ वेळा ते लोकसभा आणि 2 वेळा राज्यसभा खासदार राहिले आहेत. बिहारमध्ये त्यांनी आपल्या पक्षाला मोठं केलं. ज्यामुळे त्यांचा दबदबा भारतीय राजकारणात देखील तितकाच होता.