आरोपी सोडून बलात्कार पीडितेच्या वडीलांनाच ३१ हजाराचा दंड
आरोपी सोडून बलात्कार पीडितेच्या वडीलांनाच पंचायतीने 31 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नवी दिल्ली : आरोपी सोडून बलात्कार पीडितेच्या वडीलांनाच पंचायतीने 31 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या तिच्या वडिलांनाच दंडाची शिक्षा येथील गाव पंचायतीने ठोठावली आहे. बिहारमध्ये आरोपीला सोडून बलात्कार पीडितेच्या वडिलानांच दंडाची शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या मुलीच्या वडिलांनी दंडाची रक्कम जर भरली नाही, तर मुलीच्या गळ्यात चपालांचा हार घालून धिंड काढण्यात येईल अशी धमकी पंचायतीच्या सदस्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. ही घटना येथील जामुई गावात घडली आहे.
गावातील राकेश या तरुणाने मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांत केली आहे. यावेळी ते म्हणाले की, गेल्या रविवारी रात्री हा प्रकार घडला. त्यावेळी माझी बायको घराबाहेर गेली होती. दरम्यान, आरोपी राकेश मुलीच्या रुमध्ये आला त्यावेळी त्याला मुलीने विरोध केला आणि आरडाओरडा केला.
तेव्हा मी त्याठिकाणी गेलो असता राकेशने मला पाहून भीतीमुळे पळ काढला. मात्र, शेजा-यांनी त्याला पकडले, असे या पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेनंतर आरोपी राकेशला पंचायतीमध्ये हजर करण्यात आले असता, पंचायतीने राकेशला सोडून मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत मलाच 31 हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले. तसेच, दंडाची रक्कम जर भरली नाही, तर मुलीच्या गळ्यात चपालांचा हार घालून धिंड काढण्यात येईल अशी धमकी पंचायतीच्या सदस्यांकडून देण्यात आल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, आम्ही पंचायतीच्या सदस्यांविरोधात केलेल्या तक्रारीची आणि अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी करत आहेत. याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्यास पंचायत सदस्यांविरोधात आणि बलात्कार करणाऱ्या आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिक्षक संजय कुमार यांनी म्हटले आहे.