रतन टाटांनी आपल्या सर्वांना केलंय एक महत्त्वाचं आवाहन! पोस्टला 15 लाखांहून अधिक Likes
Ratan Tata Instagram Post: रतन टाटांनी केलेली ही पोस्ट पाहून अनेकांनी अशा माणसासाठी इन्स्ताग्रामवर रिस्पेक्ट बटण हवं असं म्हटलं आहे. तर बऱ्याच जणांनी या विषयाकडे लक्ष वेधल्याबद्दल रतन टाटांचे आभार मानले आहेत.
Ratan Tata Instagram Post: टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) हे सोशल मीडियावर सक्रीय आहेत. मात्र फारच क्वचित ते सोशल मीडियावरुन पोस्ट करतात. अशीच एक पोस्ट त्यांनी नुकतीच इन्स्ताग्रामवरुन (Instagram Post) केली असून या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेकांनी रतन टाटा यांची ही पोस्ट वाचून अशा माणसासाठी इन्स्ताग्राम लाइकऐवजी रिस्पेक्ट बटण हवं असं म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत रतन टाटा?
रतन टाटांनी इन्स्ताग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये एक काळ्या रंगाचा कुत्रा एका भाजी बाजारात बसल्याचं दिसत आहे. रतन टाटांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. "आता पावसाळा सुरू झाला असून अनेक भटकी मांजरं आणि कुत्री आपल्या कारखाली (पावसापासून वाचण्यासाठी) आसरा घेतात. आश्रय घेत असलेल्या अशा भटक्या प्राण्यांना इजा होऊ नये म्हणून आपण ती चालू करण्यापूर्वी आणि एक्सलरेट करण्यापूर्वी कारखाली (प्राणी आहेत की नाही हे) तपासणे महत्वाचे आहे. आपण वाहनांखाली प्राणी आहेत की नाही याबद्दल आपल्याला कल्पना नसल्यास ते (प्राणी) गंभीर जखमी होऊ शकतात, त्यांचा अवयवांना दुखापत होऊन त्यांना अपंगत्व येऊ शकतं किंवा ते मारले जाऊ शकतात," असं रतन टाटांनी म्हटलं आहे.
15 लाख लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस
"या ऋतूमध्ये जेव्हा आपण सर्वजण त्यांना तात्पुरता निवारा देऊ शकलो तर ते फारच चांगलं होईल," असंही रतन टाटांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. टाटांनी पोस्ट केलेल्या या फोटोला आणि आवाहानला 15 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. ही पोस्ट वाचून अनेकांनी या गोष्टीकडे लक्ष वेधल्याबद्दल टाटांचे आभार मानले आहेत. बऱ्याच जणांनी रतन टाटा हे किती संवेदनशील आहेत हे या पोस्टमधून दिसून येत असं म्हटलं आहे. रतन टाटांनी केलेल्या आवहान आपण सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे असं काहींनी म्हटलं आहे.
यापूर्वीही अनेकदा केलीय मदत
रतन टाटांचं श्वानप्रेम काही नवीन नाही. त्यांच्याकडे अनेक पाळवी कुत्रे आहेत. ते अनेक सेवाभावी संस्थांना मदत करतात जिथे प्राण्यांची काळजी घेतली जाते. मध्यंतरी त्यांनी एका स्टार्टअप कंपनीलाही निधी दिला होता जी भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षेसाठी काम करते. यापूर्वीही रतन टाटांनी अशाप्रकारची पोस्ट 2021 मध्ये केली होती. ज्यात एक व्यक्ती पावसात छत्री घेऊन उभा असून त्याने ही छत्री एका कुत्र्यासोबत शेअर केल्याचं दिसत आहे.
रात्रीच्यावेळी वाहनांच्या धडकेमुळे कुत्रा जखमी होणे किंवा मरण पावण्याच्या घटना घडतात. त्याच रोखण्यासाठी अशा कुत्र्यांच्या गळ्यात रात्रीच्या अंधारात रिफ्लेक्ट होणारे पट्टे बांधण्याची मोहीम राबवली होती. या कामासाठी टाटांनी मदत केली होती.