रतन टाटांच्या नावाने सुरु आहे फसवणूक; तरुणीचा Video शेअर करत स्वत: केला खुलासा
Fraud By Name Of Ratan Tata: भारतामधील सर्वांना रतन टाटांनी हा सल्ला दिला आहे असं म्हणत रतन टाटांचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओची दखल खुद्द रतन टाटांनी घेतली आहे.
Fraud By Name Of Ratan Tata: सोशल मीडियावरुनही हल्ली फार मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फ्रॉड होताना पाहायला मिळतं. अनेकदा कमी वेळेत अधिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक करुन सायबर गुन्हेगार फरार होतात. सायबर गुन्ह्यांमध्ये गमावलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते कारण या प्रकरणांमध्ये पैशांचा माग काढणे जवळपास अशक्य असतं. मागील काही काळात प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रकारही वाढला आहे. अमुक एका व्यक्ती आमच्या कंपनीत गुंतवणूक करायला सांगत असल्याचा बनाव करुन फसवणूक केली जाते. असाच एक प्रकार आता प्रसिद्ध उद्योजक रतन टाटांबद्दल समोर आला आहे.
नेमकं घडलंय काय?
सोना अग्रवाल नावाच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन रतन टाटांचा एआय तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आलेला एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये रतन टाटा सोना अग्रवाल ही आपली मॅनेजर असल्याचं सांगताना दिसत आहेत. तसेच कमी कालावधीत मोठा नफा कमवण्यासाठी सोना अग्रवालच्या टेलिग्राम चॅनेलला जॉइन होण्याचं आवाहन व्हिडीओतून करण्यात आलं आहे. मागणी खूप आहे आणि सर्वांना मदत करणं शक्य होणार नाही त्यामुळे त्वरा करा असं सोना अग्रवाल नावाची महिला व्हिडीओमध्ये सांगताना दिसते. अनेकांना अशापद्धतीने गुंतवणूक करुन लाखो रुपयांचा लाभ झाल्याचा आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज आल्याचं व्हिडीओच्या सुरुवातीला दाखवण्यात आलं आहे.
भारतातील प्रत्येकासाठी टाटांनी सुचवल्याचा खोटा दावा
"भारतातील प्रत्येकासाठी रतन टाटांनी हे सुचवलं आहे. तुमच्या गुंतवणुकीमध्ये वाढ करण्यासाठी तातडीने या चॅनेलमध्ये सहभागी व्हा," अशा कॅप्शनसहीत रतन टाटांचा हा खोटा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. व्हिडीओच्या सुरुवातीला रतन टाटा रोज मला हजारो संपर्क करुन पैशांमध्ये वाढ कशी करावी याबद्दल विचारणा करतात असं सांगत असल्याचं दिसतं. मात्र व्हिडीओ नीट पाहिल्यास रतन टाटांचा हा खरा व्हिडीओ नसल्याचं कळतं.
टाटांनी केला खुलासा
हा व्हिडीओ पाहून कोणत्याही नवख्या व्यक्तीला खरोखरच रतन टाटांचा या काहीतरी संबंध असेल असं वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र या व्हिडीओतील दावा खोटा असून सदर प्रकरणाशी रतन टाटांचा कोणताही संबंध असं खुद्द रतन टाटांनी इन्स्टाग्रामवरुन सांगितलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा व्हिडीओ शेअर करत रतन टाटांनी लाल रंगाच्या राँग मार्कबरोबर 'फेक' म्हणजेच खोटं असं लिहून यावर विश्वास ठेऊ नका असं म्हटलं आहे.
यापूर्वीही रतन टाटांनी त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले विचार माझे नाहीत असं एका इन्स्टाग्राम स्टोरीमधून म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा असाच खुलासा त्यांना करावा लागला आहे.