नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक उंचीच्या माऊंट एव्हरेस्ट सर करत रवींद्र कुमार हे पहिले प्रशासकीय अधिकारी ठरले आहेत. संपूर्ण देशासाठी त्यांनी या सर्वाधिक उंचीच्या पर्वतावरून एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. मुख्य म्हणजे एक महत्त्वाचं ध्येय उराशी बाळगून त्यांनी ही चढाई पूर्ण केली. ते ध्येय होतं, 'स्वच्छ गंगा' अभियानाचं. ज्याकरता त्यांनी गंगा नदीच्या पवित्र जलासह ही चढाई पूर्ण केली. काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट सर करण्याच्या यंदाच्या हंगामातील अखेरच्या दिवसांमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने ही उंची गाठली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या पेयजल मंत्रालय आणि स्वच्छता मंत्रालयात सेवेत असणाऱ्या कुमार यांनी २३ मे रोजी त्यांची ही मोहिम पूर्ण केली. 'स्वच्छ गंगा स्वच्छ भारत एव्हरेस्ट अभियान २०१९', असं त्यांच्या या मोहिमेचं नाव होतं. ज्यामुळे त्यांनी इतरांचं लक्ष वेधलं होतं. 


कुमार यांनी दुसऱ्यांदा ही यशस्वी चढाई केली असून, काही महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी या माध्यमातून दिले. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार त्यांची ही मोहिम नैसर्गिक जलस्त्रोतांच्या बचावासाठी, पाण्याच्या प्रश्नांसाठी समर्पित होती.  


भारतातून एव्हरेस्टची चढाई करणारे रवींद्र कुमार हे पहिलेच प्रशासकीय अधिकारी ठरत आहेत. ज्यांनी चीन आणि नेपाळ अशा दोन्ही बाजूंनी एव्हरेस्ट सर करण्याची किमय़ा केली. 


......हा होता एव्हरेस्ट सर करण्यामागचा मुख्य हेतू


'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या एव्हरेस्ट मोहिमेची माहिती दिली. भारतात सध्याच्या घडीला जल व्यवस्थापनाची प्रचंड गरज आहे. ज्यामध्ये जनतेचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.


'भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. वर्ल्ड बँकने मांडलेल्या अहवालानुसार जवळपास २१ टक्के आजार हे पाण्याशी संबंधित आहेत. बरं पाण्याची ही समस्या फक्त इतक्यापुरताच मर्यादित राहणार नसून, पुढे अन्नधान्यावरही त्याचे थेट परिणाम होणार आहेत. कारण, जवळपास ८० टक्के पाण्याचा वापर हा शेतीसाठी होतो. शिवाय आपल्या शरीरातही पाण्याचं महत्त्वं अधिक आहे. त्यामुळे पाण्याचं हे संकट नेमकं कुठवर पोहोचू शकतं याचा विचार आपण करुच शकतो', असं ते म्हणाले आणि तातडीने जनतेच्या सहभागातून आणि कारवाईतून त्यावर योग्य ते उपाय केले जाण्याचा आशावाद मांडला.