नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. रिव्हर्स रेपो दरात २५ बेस पॉईंटने कपात केली आहे. आता रिव्हर्स रेपो दर ४ % वरुन ३.७५% पर्यंत खाली आला आहे. रिव्हर्स रेपो दर कमी झाल्यामुळे बँकांना फायदा होईल. बँकांना कर्ज मिळण्यास त्रास होणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, कोविड १९ मुळे लघु व मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट्सना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, म्हणून टीएलटीआरओ २.० जाहीर केले जात आहे. ५०,००० कोटी रुपयांपासून सुरूवात करत आहोत. यानंतर परिस्थितीचे आकलन करून त्यात आणखी वाढ केली जाईल. टीएलटीआरओ २.० अंतर्गत एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम लघु, मध्यम आकारातील कॉर्पोरेट, एमएफआय, एनबीएफसीकडे जाईल. यासाठी अधिसूचना आजच येईल.


रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, ग्रामीण भागात आणि एनबीएफसी इत्यादींसाठी नाबार्ड, एसआयडीबीआय, एनएचबीची भूमिका महत्त्वाची आहे. कोविड १९ मुळे या संस्थांना मार्केटमधून कर्ज मिळविणे अवघड आहे, म्हणून नाबार्ड, एसआयडीबीआय, एनएचबी यांना ५०,००० कोटींची अतिरिक्त पुनर्वित्त सुविधा दिली जात आहे.


रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की, आयएमएफने या परिस्थितीला मोठे लॉक-डाउन म्हटले आहे आणि जगाला 9 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होण्याची अपेक्षा आहे. जी-20 देशांमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये १.९ टक्क्यांची सकारात्मक वाढ होईल.


शक्तीकांत दास म्हणाले की, आर्थिक स्थिती आरबीआयच्या देखरेखीखाली आहे. आमची संपूर्ण टीम कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी गुंतलेली आहे. आमचे दीडशे अधिकारी व कर्मचारी सेवा देत आहेत. आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषी क्षेत्र टिकाऊ आहे, बफर स्टॉक आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस चांगला होईल, अशी अपेक्षा आहे.