चलनी नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो काढणार? आरबीआयने स्पष्ट केलं की...
चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या चलनी नोटांवरून महात्मा गांधी यांचा फोटो काढणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत.
मुंबई: चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या चलनी नोटांवरून महात्मा गांधी यांचा फोटो काढणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालय गांधीजींच्या जागी रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांच्या चित्रासह नोटांची नवीन मालिका छापण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियामध्ये येत आहेत. ही बातमी इतक्या वेगाने व्हायरल झाली आहे की आरबीआयला या बातमीवर स्पष्टीकरण द्यावे लागले. आरबीआयने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांचं खंडन केलं आहे. असा कोणताही विचार नसल्याचं आरबीआयने ट्वीट करत स्पष्ट केलं आहे.
आरबीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत सांगितलं आहे की, "सध्याच्या चलनी नोटांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही". त्याचबरोबर संकेतस्थळावरूनही याबाबतमी माहिती दिली आहे. "प्रसारमाध्यमांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महात्मा गांधींचा चेहरा बदलून इतरांचा फोटो लावण्याचा विचार करत आहे, अशा बातम्या येत आहेत. रिझर्व्ह बँकेत असा कोणताही प्रस्ताव नाही याची नोंद घ्यावी", अशा आशयाचं पत्रक मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी पोस्ट केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातमीत आरबीआय आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम असलेले दोन भिन्न वॉटरमार्क सेट आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक दिलीप टी साहनी यांना पाठवल्याचं नमूद केलं आहे. त्यापैकी एकाची निवड केल्यानंतर त्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवता येईल. 2020 मध्ये आरबीआयच्या अंतर्गत समितीने महात्मा गांधींव्यतिरिक्त रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम यांच्या चेहऱ्यासह नोट छापण्याची शिफारस केली होती, असं व्हायरल होत असलेल्या बातमीत लिहिलं आहे. मात्र या व्हायरल बातमीत कोणतंच तथ्य नसल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. सध्या चलनात असलेल्या 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो आहे.