नवी दिल्ली : नोट बंदीमुळे उद्योग क्षेत्रात आलेली मरगळ आणि वाढती महागाई लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलेय. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या सहा महिन्यात महागाई वाढण्याच्या भीतीनं रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. महागाईच्या दरानं गेल्या अनेक वर्षातला नीचांक गाठलाय. त्याबरोबर उद्योगांच्या वाढीचा दरही कमालीचा घटलाय. त्यामुळे याला काबूत ठेवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत होती.


रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात केली आहे. त्यामुळे रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांवर आला आहे. यासोबत रिव्हर्स रेपो रेटमध्येदेखील सव्वा टक्क्याने कपात करण्यात आली आहे. 


हा गेल्या सहा वर्षांमधील निच्चांक आहे. याचा थेट परिणाम कर्जदारांच्या ईएमआयवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईएमआय कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.  मात्र, आता बॅंका गृहकर्जात कपात करणार का, याकडे लक्ष आहे.


दरम्यान, रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्याने गृह कर्ज किंवा इतर कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना दिलासा मिळणार आहे. कारण रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्याने बँकांकडूनही व्याज दरात कपात केली जाऊ शकते. रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्याने बँकांना आरबीआयकडून घेतलेल्या कर्जावर कमी व्याज द्यावे लागेल.


रिझर्व्ह बँक आधी बँकांना ६.२५ टक्के दराने कर्ज देत होती. आता या व्याज दराता घट करुन ते ६ टक्क्यांवर आले होते. त्यामुळे बँकांना कमी प्रमाणात व्याज द्यावे लागेल. ज्याचा फायदा आता बँकांना होईल.