मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बॅंक शाखा येत्या रविवारी ३१ मार्च रोजी चालू ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. यासंबंधी संबंधित बॅंकांना निर्देश देण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ३१ मार्च असून यादिवशी रविवार असल्याने सरकारी व्यवहार करणाऱ्या बॅंक शाखा चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिजर्व्ह बॅंकेकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात भारत सरकारने ३१ मार्च २०१९ रोजी कामकाजासाठी सरकारी देवाण-घेवाण करणारी सर्व बॅंक कार्यालये खुली राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारी कर, सरकारी कामांसंबंधीत इतर निधी तसेच इतर रखडलेली कामे ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च रोजी सर्व सरकारी बँका सुरू ठेवण्यात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


केंद्रीय बॅंकेने यासंदर्भात सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बॅंकांच्या अधिकृत शाखा सरकारी व्यवहारासाठी ३० मार्च २०१९ रोजी रात्री आठ वाजेपर्यंत आणि ३१ मार्च २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहेत. जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात आरटीजीएस आणि एनइएफटीसहीत सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक व्यवहार ३० आणि ३१ मार्च २०१९ रोजी अधिक वेळ सुरू राहणार आहेत.