मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पतधोरण आज जाहीर केले. यावेळी रेपो दराबाबत (Repo rate) रिझर्व्ह बँकेने (RBI ) काहीही बदल न करता आहे तेच कायम ठेवले आहेत. रेपो दर ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दर ३.३ टक्क्यांवरच कायम ठेवण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी सांगितले. दरम्यान, येत्या काळात देशाचा आर्थिक विकासदर उणे राहण्याची शक्यता आहे. चांगल्या पावसामुळे खरिप पेरणीत वाढ झाली आहे. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज गुरुवारी रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले. या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे  लक्ष लागले होते. RBIने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाऊनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात १.१५ टक्के इतकी कपात केली होती.



एप्रिल महिन्याच्या तुलनेत देशाच्या अर्थव्यवस्थेत थोडी सुधारणा झालेली दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० च्या पहिल्या सहामाहीत जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घरसण झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयातीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसेच जगभरातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. येत्या काळात कोविड-१९ची (Covid-19) लस उपलब्ध झाल्यास चित्र बदलण्याची शक्यता आहे, असं मत शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले.