RBI ने या दोन बँकांना ठोठावला दंड..... यात तुमची बँक कोणती?
या बँकांना सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत विशिष्ट ऑर्डरचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आले आहेत.
मुंबई : भारतीय रिझर्व बँक ही आपल्या देशातील सर्वात मोठी आणि केंद्रीय बँक आहे. ही बँक आपल्या देशातील शासकिय आणि खासगी बँकांच्या व्यवहारांवर लक्ष ठेऊन असते. त्याचप्रमाणे आरबीआय सगळ्या बँकांसाठी काही नियम देखील बनवतात. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांचे ज्या बँकांउल्लंघन करतात त्यांच्यावर आरबीआय दंडात्मक कारवाई करते. हल्लीच आरबीआयने अशा दोन बँकांवर दंड ठोठावला आहे ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. या बँकांना 11 लाखांचा दंड ठोठावला आहे. यात दिल्ली आणि बिजनौरच्या सहकारी बँकांची नावे आहेत.
या बँकांना सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत विशिष्ट ऑर्डरचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आले आहेत. बिजनौर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला आरबीआयने 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बिजनौर अर्बन को-ऑपरेटिव बँकेवर (Bijnor Urban Co-operative Bank) संचालकांना कर्ज देण्यास मनाई करण्यात आली होती, परंतु या आदेशाचे पालन न केल्यामुळे बिजनौर बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय नवी दिल्ली को-ऑपरेटिव बँकेवरही (National Urban Co-operative Bank, New Delhi) पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आरबीआयने बजावली नोटीस
या बँकांवर दंड आकारण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेने कारण दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये बँकांना जाब विचारला गेला. त्यावर बँकांनी जे उत्तर दिले, त्यामध्ये बँका RBIच्या नियमांचे उल्लंघ करत असल्याचे आढळले. त्यानंतर आरबीआयने या बँकांना दोषी ठरवून त्यांच्यावर दंड आकारण्याचा निर्णय घेतला.
ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही
आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही सहकारी बँकांवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या करारावर किंवा व्यवहारावर कोणतेही बंधन आहे. त्यामुळे या दंडाचा परिणाम या दोन्ही सहकारी बँकांच्या ग्राहकांवर होणार नाही.
यापूर्वी या बँकांनाही दंड ठोठावण्यात आला
यापूर्वी आरबीआयने पीएनबी (Punjab National Bank) आणि BoI (Bank of India)वर देखील दंडही ठोठावला होता. यामध्ये आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे, बँक ऑफ इंडियाला 4 कोटी, तर पंजाब नॅशनल बँकेला 2 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.