RBI on Adani Banking sector remains resilient and stable: अमेरिकेतील (America) शॉर्ट सेलिंग फर्म असलेल्या हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) जारी केलेल्या एका अहवालामुळे सध्या सर्वच बाजूंनी अडचणीत सापडलेल्या अदानी ग्रुप (Adani Group) प्रकरणाचा देशातील बँकांना फटका बसणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच देशातील केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अदानी प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतामधील बँकिंग सेक्टर फार मजबूत आणि स्थिर आहे असं 'आरबीआय'ने म्हटलं आहे.


बँका उत्तम स्थितीमध्ये...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय बँकेने आम्ही कर्जदारांवर नजर ठेऊन आहोत असंही म्हटलं आहे. 'आरबीआय'ने जारी केलेल्या पत्रकामध्ये, एका व्यवसायिक समुहाला भारतीय बँकांनी कर्ज दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या झळकत आहेत. याचीच दखल घेऊन आम्ही सातत्याने बँकिंग सेक्टरवर लक्ष ठेऊन आहोत, असं म्हटलं आहे. 'आरबीआय'ने थेट अदानी ग्रुपचा उल्लेख केलेला नाही. 'आरबीआय'ने दिलेल्या माहितीनुसार वर्तमान बँकिंग मूल्यांकनानुसार बँकिंग क्षेत्र स्थिर आहे. निधी उपलब्धता, संपत्तीची गुणवत्ता, कॅश आणि इतरही गोष्टींचा विचार केल्यास सध्या भारतीय बँका उत्तम स्थितीत असल्याचं 'आरबीआय'ने म्हटलं आहे.


आरबीआयचा डेटाबेस


केंद्रीय बँकेने नियामक आणि पर्यवेक्षक म्हणून 'आरबीआय' आर्थिक स्थैर्य कायम ठेवण्यासाठी बँकिंग क्षेत्र आणि प्रत्येक बँकेवर लक्ष ठेऊन असल्याचं म्हटलं आहे. आरबीआयकडे मोठ्या कर्जांसंबंधितील सूचनांचा केंद्रीय संग्रह डेटाबेस सिस्टीममध्ये आहे. या डेटाबेसमध्ये पाच कोटी आणि त्याहून अधिक कर्ज घेणाऱ्यांची माहिती आहे. या डेटाबेसची माहिती कर्जासंदर्भातील देखरेख करण्यासाठी वापरली जाते. केंद्रीय बँक सतर्क आहे, असं 'आरबीआय'ने म्हटलं आहे. भारतीय बँकिंग क्षेत्र सध्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर स्थिर रहावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्व बँका मोठ्या कर्जांसंदर्भातील नियमांचं पालन करत आहेत, असंही 'आरबीआय'ने म्हटलं आहे. 


आज भाव वधारला


हिंडनबर्गच्या अहवालानंतर सातत्याने आर्थिक फटका बसत असलेल्या अदानी एन्टरप्रायझेसच्या शेअर्ससंदर्भात आज सात दिवसांनंतर थोडी दिलासादायक बातमी समोर आली. आज शेअर बाजारातील दुसऱ्या सत्रामध्ये कंपनीच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाली आहे. सकाळी 1017 रूपयापर्यंत घसरलेला कंपनीचा शेअर दुपारनंतर जवळपास 500 रुपयांनी वधारला. दुपारच्या सत्रात शेअरचा भाव 1570 रुपयांच्या वर गेला. अदानी एंटरप्रायझेसने आपला 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ शेअर मार्केटमधून काढून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा बुधवारी रात्री केली. त्यामुळे कंपनीच्या विश्वासर्हतेसंदर्भातही उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आज शेअर्सचा भाव वधारल्याने आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कंपनीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.