२०० रुपयांच्या नोट संदर्भात महत्वाची बातमी
आरबीआयने २०० रुपयांची नोट चलनात आणली. मात्र, अद्यापही २०० रुपयांच्या नोटा व्यवहारात मोठ्या प्रमाणात पहायला मिळत नाही. बँकांकडून काहीच नोटा नागरिकांना मिळाल्या आहेत.
नवी दिल्ली : आरबीआयने २०० रुपयांची नोट चलनात आणली. मात्र, अद्यापही २०० रुपयांच्या नोटा व्यवहारात मोठ्या प्रमाणात पहायला मिळत नाही. बँकांकडून काहीच नोटा नागरिकांना मिळाल्या आहेत.
आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, आता लवकरच २०० रुपयांच्या नोटा एटीएममधून निघण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी आरबीआयने बँकांच्या एटीएममध्ये महत्वाचे बदल करण्यास सांगितलं आहे.
इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या संबंधी जोडलेल्या तज्ञांनी सांगितले की यासाठी बँकांवर तब्बल ११० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
बँकांना एटीएममध्ये नोटा टाकण्याचे दिले निर्देश
आरबीआयने बँकांना सांगितले की, लवकरात लवकर बँकांच्या एटीएममध्ये २०० रुपयांच्या नोटा डिपॉढिट करा. यामुळे नागरिकांना एटीएमच्या माध्यमातून २०० रुपयांच्या नोटा मिळतील आणि सुट्या पैशांची समस्याही दूर होईल. सूत्रांच्या मते, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ५-६ महिन्याचा कालावधी लागू शकतो.
आकड्यांवरुन स्पष्ट आहे की, एटीएममधून पैसे काढण्याचा ग्राफ वेगाने वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६मध्ये नोटबंदीची घोषणा केली त्याच्या तुलनेत ९५ टक्के चलन हे व्यवहारात आलं आहे.
एटीएममध्ये बदलासाठी खर्च
भारतामध्ये सध्याच्या स्थितीत २.२ लाख एटीएम आहेत. यामध्ये दोनशे रुपयांच्या नोट फिट करण्यासाठी काही बदल करण्याची गरज आहे. यासाठी जवळपास ११० कोटी रुपये खर्च येणार आहे आणि हे काम जवळपास ६ महिन्यांत पूर्ण होईल. अनेक बँकांनी आपल्या एटीएममध्ये बदल करण्याचं काम सुरुही केलं आहे.