नवी दिल्ली - ५००, १००, ५० आणि १० रुपयांच्या नव्या नोटांनंतर आता रिझर्व्ह बॅंक लवकरच २० रुपयांची नवी नोट बाजारात आणणार आहे. या नोटेमध्ये काही अतिरिक्त फिचर्सही असणार आहेत, असे बॅंकेच्या कागदपत्रांवरून कळते. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅंकेने २००० रुपयांची आणि २०० रुपयांची नवी नोट बाजारात आणली होती. त्याचबरोबर ५००, १००, ५० आणि १० रुपयांच्याही नव्या नोटा आणल्या होत्या. त्याचवेळी आता २० रुपयांचीही नवी नोट येणार याची चर्चा सुरू झाली होती.  २०१६ पासूनच रिझर्व्ह बॅंकेकडून महात्मा गांधी श्रेणीतील नव्या नोटा ठराविक अंतराने बाजारात आणल्या जात आहेत. या नोटांचा आकार आणि डिझाईन आधीच्या नोटांपेक्षा वेगळा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०१६ रोजी २० रुपयांच्या ४.९२ अब्ज नोटा सध्या चलनात होत्या. मार्च २०१८ पर्यंत हाच आकडा दुप्पट होऊन १० अब्जपर्यंत जाऊन पोहोचला होता. मार्च २०१८ अखेर बाजारात उपलब्ध असलेल्या एकूण चलनी नोटांपैकी ९.८ टक्के नोटा या २० रुपयांच्या आहेत, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.


नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती. यावेळी १००० आणि ५०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी २००० आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणण्यात आल्या होत्या.