ऑनलाईन व्यवहारात सामान्यांना दिलासा; १६ डिसेंबरपासून होणार `हा` बदल
`रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया`चा निर्णय
मुंबई : ऑनलाईन ट्रान्झक्शन करणाऱ्या लोकांसाठी 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने (RBI) मोठा दिलासा दिला आहे. 'आरबीआय'ने निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) अंतर्गत व्यवहाराची सुविधा २४ तास, आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध होणार आहे. 'आरबीआय'च्या या निर्णयानुसार, आता कधीही आणि कोणत्याही वेळी NEFTद्वारे पैशांची ऑनलाईन देवाण-घेवाण करता येऊ शकते.
रिझर्व्ह बँकेने एका अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, NEFT ट्रान्झक्शन २४ तास, आठवड्यातील सातही दिवस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ डिसेंबर २०१९ पासून ही सुविधा लागू करण्यात येणार आहे. यासोबतच 'एनईएफटी' व्यवहारात अडचण येऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेने सर्व सदस्य बँकांना चालू खात्यात पुरेशी रक्कम नियामकांकडे ठेवणे आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. सर्व बँकांना ही सेवा योग्य पद्धतीने लागू करण्यासंबंधी सांगण्यात आलं आहे. बँका ग्राहकांना 'एनईएफटी'मध्ये झालेल्या बदलांविषयी माहिती देऊ शकतात.
काय आहे NEFT -
NEFT ऑनलाईन ट्रान्झक्शनचा एक प्रकार आहे. NEFTअंतर्गत एकावेळी २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करता येऊ शकते. हे ट्रान्झक्शन बँक ब्रान्च किंवा इंटरनेट आणि मोबाईल बँकिंकद्वारा करता येते. सध्या NEFT ट्रान्झक्शन सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत केलं जातं. तर पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत करता येतं.
'RBI'ने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत NEFTद्वारा २५२ कोटी रुपयांचं ट्रान्झक्शन करण्यात आलं आहे. या व्यवहारात वर्षाला २० टक्क्यांची वृद्धी झाली आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच 'एनईएफटी' व्यवहारांवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.