नवी दिल्ली : ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांवर लिहिलं तर अशा नोटा बँका घेणार नाहीत, अशा बातम्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्या होत्या. पण या सगळ्याबाबत आता आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. ५०० आणि २ हजारांच्या नोटांवर काही लिहिलं असेल तरी अशा नोटा घ्यायला बँक नकार घेऊ शकत नाही, असं आरबीआयनं स्पष्ट केलंय. ५००-२००० च्या नोटांवर काहीही लिहिलं असलं किंवा नोटांचा रंगही गेला असला तरी बँका या नोटा नाकारू शकत नाहीत, असं आरबीआयनं सांगितलं आहे.


नोटा नाकारू शकत नाहीत पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँका या नोटा नाकारू शकत नाहीत पण ग्राहक बँकेत गेले तर त्यांना या नोटा बदलून मिळणार नाहीत तर त्यांना बँक खात्यांमध्ये या नोटा जमा कराव्या लागतील, असंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. नव्या नोटा बदली करण्यासाठी नियमावली आलेली नाही, त्यामुळे लिहिण्यात आलेल्या नोटा बदलून मिळणार नाहीत.


स्मार्टफोन नसेल तरी इंटरनेट बँकिंगची सुविधा


ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा व्यक्तींनाही इंटरनेट बँकिंगची सुविधा वापरण्यात येणार आहे. फोनवरून *99# हा नंबर डायल केल्यावर इंटरनेट शिवाय दोन खात्यांमध्ये देवाण-घेवाण होऊ शकते. यासाठी ग्राहकाला हा नंबर डायल करून रजीस्ट्रेशन करावं लागणार आहे.


ग्राहकांच्या अधिकारांबाबत आरबीआयकडून माहिती


दिल्लीच्या प्रगती मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा सुरु आहे. या मेळाव्यामध्ये आरबीआयकडून ग्राहकांना त्यांच्या अधिकारांबाबत माहिती देण्यात येत आहे. तसंच डिजीटल व्यवहार करण्यासाठीही ग्राहकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.


१० रुपयांच्या नाण्यांबाबत...


प्रगती मैदानात आरबीआयकडून स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समस्या घेऊन येत आहेत. यातले बहुतेक प्रश्न हे ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांच्या वैधतेबाबत आहेत. तसंच दुकानदार १० रुपयांची नाणी घ्यायला नकार देतात, अशा तक्रारी ग्राहकांकडून करण्यात आल्या. पण १० ची सगळी नाणी वैध आहेत, त्यामुळे दुकानदार ही नाणी नाकारू शकत नाहीत. ५००, २ हजार आणि २०० रुपयांच्या नोटेवर १७ फिचर्स आहेत तर ५० रुपयांच्या नोटेवर १४ फिचर्स असल्याची माहिती आरबीआयनं दिली आहे.