नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी देशाला 'अच्छे दिन' दाखवण्याचे स्वप्न दाखवले. त्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक व्यवस्थापनाची साथ मिळाली. त्यामुळे भाजप प्रणित एनडीएला सत्तासोपान चढता आला. पण, आता या दोघांच्या नेतृत्वाखाली चक्क एनडीएवरच 'बुरे दिन' येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रपक्षांनी व्यक्त केलेली भावना आणि घेतलेले निर्णय कारणीभूत ठरू शकतात, अशी स्थिती आहे.


भाजपच्या राज्य आणि राष्ट्रीय वर्तुळात उडालेली खळबळ अद्याप कायम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने सत्तेत सहभागी असलेला मित्रपक्ष भाजपला जोरदार दणका दिला आणि आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या जाहीर केले. त्यानंतर भाजपच्या राज्य आणि राष्ट्रीय वर्तुळात उडालेली खळबळ अद्याप कायम आहे. तोपर्यंत एनडीएतील दुसऱ्या एका सहकाऱ्याने भाजपला मोठा धक्का दिला आहे. मित्रत्व जपा अन्यथा आम्हालाही आमचा पर्याय रिकामा आहे. आम्ही स्वबळावर लढू, असा थेट इशारा तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहेत. इतकेच नव्हे तर, आपला पक्ष एनडीएशी असलेले संबंधही तोडेन असे चंद्राबाबूंनी म्हटले आहे. एनडीएतून वेगळे होण्याची भावना आपल्यात निर्माण होण्यास भाजपच जबाबदार असल्याहेची नायडू यांनी म्हटले आहे.


आम्ही मित्रधर्म सांभाळत आहोत. पण...


राज्यातील भाजप नेत्यांनी तेलगू देसमवर केलेल्या टीकेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे की, राज्यात टीका करणाऱ्या नेत्यांवर रोख लावणे हे केंद्रीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. अर्थात आम्ही मित्रधर्म सांभाळत आहोत. पण, आम्ही सोबत रहावे असे जर भाजपला वाटत नसेल तर, आम्हाला आमचा वेगळा मार्ग निवडण्याचा पर्याय आहे. दरम्यान, भाजप आपल्या मित्रपक्षांना महत्त्व देत नाही. त्यामुळे आम्ही आमचा मार्ग निवडला असून, आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेनेने म्हटले होते.


भाजपची वायएसआर काँग्रेससोबत हातमिळवणी?


दरम्यान, नायडू यांच्या वक्तव्याला वेगळ्या अर्थाने महत्त्व आहे. आंध्र प्रदेशातील राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर, असे दिसते की, जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर कॉंग्रेस भाजपसोबत हात मिळवू शकते. गेल्या महिन्यात वायएसआर काँग्रेसचे नेते विजयसाई रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. सांगितले जाते की, खासदार विजयसाई यांचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. त्यामुळे चंद्राबाबूंच्या तेलगू देसमला धोबिपछाड देत भाजप वायएसआर सोबत नवी मांडणी करू शकते. हा धोका विचारात घेऊनच मुरब्बी चंद्राबाबूंनी नवा आणि तितकाच महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे.