मुंबई : व्हाटसअपवर किंवा सोशल मीडियावर तुम्हालाही '१ ऑक्टोबर एटीएममधून ५००-२००० च्या नोटा निघणार नाहीत' अशा आशयाचा मॅसेज पाहायला मिळाला असेल... त्यामुळे नागरिकांत पुन्हा एकदा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटांशी संबंधित हा मॅसेज काही वेळातच वायरल झालेला दिसतोय. परंतु, वायरल होणारा हा दावा कितपत खरा आहे? आणि कोणत्या माहितीच्या आधारे हा दावा करण्यात आलाय? असा प्रश्न मात्र हा मॅसेज विचार न करता किंवा माहिती न घेता पुढे फॉरवर्ड करणाऱ्यांना पडत नाहीय.


वायरल होणारा मॅसेज


सोशल मीडियावर वेगानं पसरणाऱ्या या मॅसेजमध्ये देशात नोटांची कमतरता भासत असल्यानं आरबीआयनं बँकांना ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये न टाकण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत आणि त्यामुळेच ऑक्टोबरनंतर एटीएममधून तुम्हाला केवळ १०० रुपयांच्या नोटाच मिळतील, असं म्हटलं गेलंय.


'वायरल'ची पोलखोल


परंतु, हा मॅसेज धादांत खोटा असल्याचं समोर येतंय. आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून एटीएममधून केवळ १०० रुपयांच्या नोटाच निघतील हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट होतंय.


त्यामुळे नागरिकांनो, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही... आणि तुम्हालाही असे मॅसेज आले तर ते फॉरवर्ड करू नका, असं 'झी २४ तास'चं आवाहन आहे.