7 मिनिटांची मिटींग आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या गेल्या नोकऱ्या! `या` बड्या कंपनीने घेतला निर्णय
IBM layoff:
IBM layoff: तुमच्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कामासाठी अनेक मिटींग होत असतील. पण कधी अचानक घेतलेल्या छोट्या मिटींगमध्ये हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरच घाला घालण्यात आल्याचा प्रसंग घडला तर? हो. काही कर्मचाऱ्यांनी हा अनुभव नुकताच घेतलाय. एखादा बॉम्ब अचानक येऊन पडावा आणि सर्व उद्वस्त व्हावं, याचा प्रत्यय त्यांना आला. जगप्रसिद्ध आयबीएममधून हे वृत्त आलंय. गेल्या दोन वर्षापासून सलग येथून कर्मचारी कपातीचे वृत्त समोर येतंय. पण आता आलेली बातमी नक्कीच धक्कादायक आहे. आयबीएमची मार्केटींग आणि कम्युनिकेशन टीममध्ये नुकतीच कपात करण्यात आली आहे. चीफ कम्युनिकेशन ऑफिसर जोनाथन अडाशेक यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक अवघ्या 7 मिनिटांची झाली आणि यातच आयबीएम कर्मचारी कपात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असे असले तरी नेमक्या किती जणांच्या नोकरीवर कुऱ्हाड पडणार? हे स्पष्टपणे सांगण्यात आले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागातील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
IBM ने आधीच दिले होते संकेत
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येणाऱ्या व्यावसायिक वातावरण तयार केले जात होते. कर्मचाऱ्यांनी यासाठी तयार रहावे असे आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा यांनी सांगितले होते. येणाऱ्या 5 वर्षामध्ये साधारण 30 टक्के नोकऱ्या धोक्यात असतील असे त्यांनी 2023 मध्ये सांगितले होते. यामध्ये विशेषत: बॅक ऑफिसच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनमुळे या नोकऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
आयबीएममध्ये कर्मचारी कपात होण्याची ही पहिली वेळ नाही. जानेवारी 2023 मध्ये कंपनीतून 3,900 लोकांची कपात करण्यात आली होती. 2024 च्या अखेरपर्यंत कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या वर्षाच्या सुरुवातीइतकी असेल असे तेव्हा सीएफओ जेम्स कवनॉफ यांनी म्हटले होते.
3 महिन्यात 50 हजार नोकऱ्या गेल्या
2024 हे वर्षे नोकरदार वर्गासाठी धक्कादायक ठरतंय. केवळ टेक्नोलॉजी सेक्टरमधील साधारण 50 हजार नोकऱ्या गेल्या आहेत. 2024 मध्ये आतापर्यंत 204 कंपन्यांतून 50 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. Layoffs.fyi ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. आयबीएम मार्केटिंग अॅण्ड कम्युनिकेशन डिपार्टमेंटमधील कर्मचारी कमी करण्याचा निर्णय याच ट्रेण्डचा भाग असल्याचे म्हटले जात आहे.