नवी दिल्ली : देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु करण्यात आलं आहे. या लॉकडाऊन दरम्यान ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये काही अटी-शर्तींसह दुकानं सुरु करण्याची सूट देण्यात आली आहे. इतर दुकानांसह दारुची दुकानं, वाईन शॉपही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जवळपास एक महिन्यानंतर दारुची दुकानं सुरु होत असल्याने वाईन शॉप सुरु होण्याआधीच मद्यपींनी दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचं पाहायलं मिळालं. काही ठिकाणी या रांगा 3-3 किलोमीटरपर्यंत लांब होत्या. लॉकडाऊननंतर कर्नाटकात दारु विक्रीचा रेकॉर्ड झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊननंतर वाईन शॉप सुरु झाल्यावर एका दिवसांत म्हणजे सोमवारी राज्यात 45 कोटी रुपये दारुची विक्री झाली आहे. 


उत्पादन शुल्क विभागानुसार, सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 3.9 लाख लीटर बियर आणि 8.5 लाख लीटर इंडियन मेड दारुची विक्री झाली. या दोघांमिळून एकूण 45 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती आहे. राज्याचे महसूल मंत्री एच. नागेश यांनी सांगितलं की, आम्हाला 25 कोटी रुपयांच्या दारु विक्रीचा अंदाज होता, परंतु हा जमा झालेला महसूल त्याहूनही अधिक आहे. यापैकी 40 टक्के दारु विक्री एकट्या बंगळुरुमधून झाली आहे. त्याशिवाय, राज्यात पुरेसा साठा असल्याने लोकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये, असंही नागेश यांनी सांगितलं.


मंगळवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पानुसार दारुचे दर वाढणार असून अतिरिक्त 6 टक्के उत्पादन शुल्क या आर्थिक वर्षापासून (आर्थिक वर्ष 2020) लागू होणार आहे.


उत्पादन शुल्क आयुक्त यशवंतनाथ वी यांनी सांगितलं की, सर्वसाधारणपणे कोणत्याही दिवशी जवळपास एक लाख लिटरची दारु विक्री केली जाते. वाईन शॉप सुरु राहणार असून दारु उपलब्ध असल्याने लोकांनी दारु खरेदी करताना घाई करु नये, असं ते म्हणाले. सर्व वाईन शॉप आणि ग्राहकांना सरकारकडून सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचं पालन करणं आवश्यक असणार असून कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनाही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.