मुंबई :  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार, 1 एप्रिलपासून 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांबाबत एक मोठं पाऊल उचललं जाणार आहे. त्यामुळे आता जर तुमची गाडी  15 वर्षापेक्षा जूनी असेल तर, त्याच्या रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी (Registration Renewal of Vehicle) तुम्हाला आठ पटीने जास्त पैसे भरावे लागणार आहे.  त्यामुळे आता तुम्हाला 1 एप्रिलपासून 15 वर्षे जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी 5,000 रुपये भरावे लागतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हे शुल्क फक्त 600 आहे. तर परदेशी कारसाठी हे शुल्क 15 हजार रुपयांवरून 40 हजार रुपयांपर्यंत वाढेल. तर दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी 300 रुपयांऐवजी 1000 रुपये मोजावे लागणार आहेत.


एवढेच नाही तर नोंदणीला उशीर झाल्यास तुम्हाला त्याचा वेगळा दंडही भरावा लागणार आहे. खासगी वाहनांच्या नोंदणीला विलंब झाल्यास दरमहा 300 रुपये आणि व्यावसायिक वाहनांसाठी  दरमहा 500 रुपये वेगळे शुल्क भरावे लागणार आहे.


मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिलपासून जुन्या वाहतूक आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीचा खर्चही वाढणार आहे. व्यावसायिक वाहने आठ वर्षांपेक्षा जुनी झाल्यानंतर त्यांच्याकडे फिटनेस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.


टॅक्सींसाठी फिटनेस चाचणीचे शुल्क 1,000 रुपयांऐवजी 7,000 रुपये असेल. बस आणि ट्रकसाठी हे शुल्क 1,500 रुपयांवरून 12,500 रुपयांपर्यंत वाढणार आहे.


केंद्र सरकारने अनुपालन शुल्क वाढवले ​आहे, जेणेकरुन ज्या वाहनांमुळे प्रदुषण जास्त होते अशा गाड्या स्क्रॅपमध्ये टाकल्या जातील. भारतातील एक कोटीहून अधिक वाहने स्क्रॅपिंगसाठी पात्र आहेत. कार मालकांना जुनी वाहने स्क्रॅप करणे सोपे व्हावे, यासाठी केंद्राने प्रक्रियाही ऑनलाइन केली आहे.


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन स्क्रॅपिंग सुविधा दुरुस्ती नियम 2022 ची अधिसूचना जारी केली आहे. यात मोटार वाहन नियम 23 सप्टेंबर 2021 मध्ये सुधारणा करण्यात आली आहेत, जे नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा (RVSF) स्थापन करण्याची प्रक्रिया मांडतात.


नियमात आलेल्या अभिप्रायाच्या आधारे हे बदल करण्यात आले आहेत. याद्वारे, वाहन मालक, आरव्हीएसएफ ऑपरेटर, डीलर्स, प्रादेशिक परिवहन अधिकारी इत्यादी सर्व भागधारकांसाठी वाहन स्क्रॅपिंगची प्रक्रिया सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी केली गेली आहे.