Crime News : जगभरात सध्या व्हॅलेंटाईन वीक (valentine’s week) साजरा केला जातोय. संपूर्ण आठवडाभर प्रेमीयुगुल आपल्या प्रियकरांसोबत व्हॅलेंटाईन वीक साजरा करत आहेत. तर कुठे नुकत्याच प्रेमात पडलेल्या प्रियकरांसाठी हा आठवडा आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगली संधी घेऊन आलेला असतो. काहींना होकार मिळतो तर काहींच्या प्रेमाला फुलस्टॉप. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एका प्रियकराने त्याचं प्रेम नाकारलं म्हणून टोकाचं पाऊल उचललं आहे. तरुणाच्या कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूरमध्ये (indore) प्रपोज डेच्या (Propose Day) दिवशी, एक माथेफिरु प्रियकर त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणीला देशी बनावटीच्या पिस्तुलाने धमकावात होता. मात्र त्यावेळी तरुणीच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याला जीव गमवावा लागला आहे. प्रियकराने तरुणीच्या मित्रावरच गोळीबार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. यानंतर आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला आहे. दुसरीकडे तरुणाच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या लोकांनी गुरुवारी पोलीस नियंत्रण कक्षाबाहेर रोष व्यक्त केला. गाठून निषेध केला. आरोपीला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी लोकांनी केली आहे.


राहुल यादव (23) या माथेफिरु प्रियकराने बुधवारी एका तरुणीला प्रपोज केल्यानंतर तिने नकार दिला. यानंतर संतापलेल्या राहुल यादवने तरुणीवर बंदूक रोखली. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या या तरुणीसोबत तिचा सहकारी संस्कार वर्मा (20) हा देखील होता. तरुणीवर बंदूक रोखलेली पाहून संस्कारने राहुलला थांबवत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र राग अनावर झालेल्या यादवने देशी कट्ट्याचा चाप ओढला आणि गोळी थेट संस्कारच्या डोक्यात घुसली.


दरम्यान, गोळी लागलेल्या संस्कारला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर आरोपी राहुल यादवने आपल्या कुटुंबासह घर सोडून पळ काढला आहे. पोलिसांनी आता यादव याचा तपास सुरु केला आहे.