नवी दिल्ली : अंगातले भूत उतरविण्याच्या नावाखाली अघोरी प्रकार केल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. मात्र, आता असा एक प्रकार समोर आला आहे जो ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. चेटकीण समजून गावातील नागरिकांनी एका महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिहारमधील धमदाहा क्षेत्रात ही घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, पार्वती मुर्मू यांचा दिर रामू याचा पोटाच्या आजाराने मृत्यू झाला. यानंतर रामू यांचा लहान भाऊ मंगल, अजय आणि सुलम्भा देवी यांनी मिळून पार्वतीला मारहाण केली. पार्वती चेटकीन असल्याचं म्हणत तिला जबर मारहाण केली आणि मृत रामू याला जिवंत करण्याची मागणी केली. तसेच तिचा पती संजय याच्याकडून ५० हजारांची मागणीही केली.


संजय पैसे अणण्यासाठी घराबाहेर जाताच घाबरलेल्या पार्वतीने आपला जीव वाचवण्यासाठी मृतक रामू याला जिवंत करण्याचा प्रयत्न करु लागली. मात्र, रामू जिवंत झाला नाही आणि त्यानंतर तिच्या आजुबाजुला असलेल्या ग्रामस्थांनी तिला जबर मारहाण केली.


पार्वतीला केलेल्या मारहाणीनंतर ती बेशुद्ध झाली. आपली आई बेशुद्ध झाल्याचं पाहून तिची मुलगी सविताने धावत-धावत पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पार्वतीला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी पार्वती मृत झाल्याचं घोषित केलं.


या प्रकरणी पार्वतीची मुलगी सविताने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी १६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.