जालना : राज्यात रेमडीसीवीरचा (Remdesivir injection) तुटवडा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय त्यामुळे रेमडीसीवीरचं वाटप दोन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. जालन्यात आज टोपे यांच्या हस्ते खाजगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांना १० हजार रेमडेसीवीर इंजेक्शनचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यापुढे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही,काळाबाजार देखील होणार नाही असे ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाफकीन कंपनी सरकारच्या वतीने टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल असे ते म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यात एक स्टॉकीस्ट राहणार असून त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल. जिल्हाधिकारी खाजगी रुग्णालयाची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करेल. या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण असल्याने काळाबाजार होणार नाही अशी माहिती देखील टोपे यांनी दिलीय.


यातून खाजगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील असंही त्यांनी सांगितलं. रेमडेसिवीर इंजेक्शनचा टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे योग्य पध्दतीने वापर केल्यास इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राने ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. मात्र कोणतंही राज्य या संदर्भात मदत करायला तयार नसून आपल्याकडे उपलब्ध असलेला ऑक्सिजनची गळती थांबवून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल हाच मार्ग असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ब्रेक द चेन संदर्भातील आवाहनाला सर्वांनी घरी राहून सहकार्य करावं असंही टोपे म्हणाले.


सध्या संपूर्ण राज्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. जालन्यातील घनसावंगी येथे येत्या 15 दिवसांत हवेतील पूर्ण ऑक्सिजन शोषून घेणारा प्लांट उभारला जातोय. यात यश मिळालं तर संपूर्ण राज्यात असे प्लांट उभे करता येतील आणि लिक्विड ऑक्सिजनला पर्याय मिळेल असंही ते म्हणाले.