रेमडेसिवीर विषयी केंद्राचा मोठा निर्णय... तरच उपलब्ध होवू शकेल सर्वांना रेमडेसिवीर
कोरोनाची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शनविषयी अतिशय महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 'जो पर्यंत देशात परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शन आणि रेमडेसिविर एक्टिव फार्मास्यूटिकल इंग्रेडिएंट्सच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली.' असं केंद्र सरकारने रविवारी सांगितलं आहे.
येत्या काही काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच फार्मास्युटिकल विभाग देशातील उत्पादकांशी संपर्क साधून रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन वाढवत असल्याचे देखील केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपल्या पुरवठा आणि डिस्ट्रीब्युटर्सकडी साठ्याची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात देशात एकून 1 लाख 45 हजार 384 रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. दरम्यान, 77 हजाराहून अधिक रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर 794 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात 24 तासांत 55 हजार 411 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 309 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 53 हजार 5 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेक आले आहेत. झपाट्याने वाढत असलेली रूग्णसंख्या पाहाता राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही.