काँग्रेस कार्यालयाबाहेर वायुसेना प्रमुखांचे `राफेल` प्रदर्शन
कॉंग्रेस मुख्यालयाच्या बाहेर राफेल लढाऊ विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे.
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान हा तो शब्द आहे ज्याचा वापर करुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराचे रान उठवले. राफेल प्रकरणावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. देशभरात आता सर्वांपर्यंत राफेल प्रकरण पोहोचले आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राहुल गांधींचा हा मुद्दा प्रभावी ठरला नसल्याचे स्पष्ट झाले. पण आता याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयाच्या बाहेर राफेल लढाऊ विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे.
दिल्लीतील 24 अकबर रोडवर कॉंग्रेस पार्टीचे मुख्यालय आहे. त्याच्याजवळच सध्याचे वायुसेना प्रमुख बीएस. धनोआ यांचे निवासस्थान आहे. आता या निवासस्थानाबाहेर राफेल विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे. ही प्रतिकृती दिल्ली वासियांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली आहे. न्यूज एजंसी एएनआयने याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वी बीएस धनोआ यांनी भारतीय वायुसेनेचे मिग-21 लढाऊ विमानाची प्रतिकृती ठेवत शहीदांना श्रद्धांजली दिली. माध्यमांशी संवाद साधताना आम्ही राफेल लढाऊ विमानाची वाट पाहत असल्याचे म्हटले होते. आता त्यांच्या राफेलचे कौतूक करण्याच्या वक्तव्याची चर्चा होत आहे. राफेल या सप्टेंबरमध्ये भारतात येणार आहे. भारत सरकार या प्रकरणावरून मागे हटणार नाही हेच या प्रतिकृतीतून सिद्ध होत आहे.
निवडणुकीत राफेलचीच चर्चा
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर राफेल प्रकरणी चोरीचे आरोप लावले. यावरून मोदी सरकार बॅकफूटवर गेले होते. यानंतरच राहुल यांच्याकडून चौकीदार चोर है चे नारे लावण्यात आले होते.