मुंबई - रेपो दरात पाव टक्क्याची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेच्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात गुरुवारी घेण्यात आला. रेपो दर ६.५ टक्क्यांवरून आता ६.२५ टक्के करण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जासह इतर विविध कर्जांवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. व्याजदरात कपात केली जावी, अशी मागणी केली जात होती. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्त्वाखाली पतधोरण आढावा मंडळाने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शक्तिकांत दास यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच द्विमासिक पतधोरण आढावा बैठक पार पडली. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षातील ही शेवटची पतधोरण आढावा बैठक होती. पतधोरणाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी दिवसभर रिझर्व्ह बॅंकेच्या मुख्यालयात बैठक सुरू होती. गुरुवारी सकाळी बैठक झाल्यानंतर रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करण्याची घोषणा करण्यात आली. याआधी साडेसहा टक्के असलेला रेपो दर आता सव्वा सहा टक्के करण्यात आला आहे. यामुळे बॅंकांकडे अधिक रक्कम उपलब्ध होईल. त्यामुळे पुढील काळात गृह कर्ज त्याचबरोबर वाहन कर्जावरील व्याजदर आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील काळातही देशातील महागाई नियंत्रित राहण्याचा अंदाज पतधोरण आढाव्यावेळी वर्तविण्यात आला. याच अंदाजाचा आधार घेत रेपो दरात कपात करण्यात आलेली असू शकते, असे अभ्यासकांनी म्हटले आहे. 


दरम्यान, रेपो दरात रिझर्व्ह बॅंक पाव टक्क्यांची कपात करेल, असा अंदाज आधीपासूनच वित्तसंस्था आणि बॅंकप्रमुखांनी वर्तविला होता. अखेर गुरुवारी तो खरा ठरला. रेपो दर कपातीचे अनेकांनी स्वागत केले आहे..