Republic Day 2019: ७०व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं खास डूडल
India`s Republic Day अशा शीर्षकाअंतर्गत हे डूडल साकारण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : शनिवार, २६ जानेवारी २०१९ च्या दिवशी भारत ७०वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशाच्या आणि देशवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या दिवसाचा उत्साह सकाळपासूनच सगळीकडे पाहायला मिळत आहे. यामध्ये गुगलही मागे राहिलेलं नाही. एका खास डूडलच्या माध्यमातून गुगलने भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
India's Republic Day अशा शीर्षकाअंतर्गत हे डूडल साकारण्यात आलं आहे. भारतात सर्व धर्म, प्रांत आणि पंथाचे लोक एकोप्याने, गुण्यागोविंद्याने राहतात हीच बाब अधोरेखित करत हे डूडल साकारत देशातील शक्य त्या अनेक महत्त्वाच्या बाबी या डूडलमध्ये पाहायला मिळत आहेत. आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जानेवारी १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून सर्वांसमोर आला. ज्याच्या बळावर जगाच्या नकाशावरही भारताची वेगळी अशी ओळख प्रस्थापित झाली. भारतीय संविधान हे अनेक गोष्टींसाठी प्रमाण ठरलं.
देशासाठी अत्यंत खास असणाऱ्या या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी नवी दिल्लीतील राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सैन्यदलाच्या संचलनाचं आयोजन केलं गेलं आहे. यंदाच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचे सिरील रामाफोसा हे संचलनाच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील. राजपथावर आयोजित करण्यात आलेल्या या परेडमध्ये भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचं दर्शन घडवणारे लक्षवेधी चित्ररथही सर्वांचं लक्ष वेधणार आहेत.
पूर्वसंध्येच्या अभिभाषणात राष्ट्रपती काय म्हणाले?
७०व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध मुद्द्यांचा वेध घेतला. 'विविधता हेच भारताचं बलस्थान आहे. देशातील साधन संपत्तीवर सर्वांचा एकसमान वाटा आहे. आगामी काळातील भारताचं यश हे संपूर्ण जगासाठी आदर्श ठरू शकतं. आतापर्यंत भारतीय प्रजासत्ताक व्यवस्थेने जो प्रवास केला आहे त्यासाठी आपण मागील पिढ्यांचे आभार मानले पाहिजेत. मात्र, अजूनही देशाला खूप लांबचा पल्ला गाठायचा असल्याचं ते म्हणाले.