पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता नवीच भूमिका घेतली आहे. सरकारी क्षेत्रासोबतच आता खासगी क्षेत्रामध्येही आरक्षणाचा विचार केला जावा, अशी भूमिका नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय पातळीवरही या मुद्द्याचा विचार केला जावा, असेही नितीश यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश कुमार बोलत होते. दरम्यान, नितीश यांच्या या भूमिकेला भाजपचे बिहारमधील खासदार हुकूमदेव नारायण यादव यांनीही पाठिंबा दिला आहे. नितीश यांचे म्हणने बरोबर असून, राष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा मी उपस्थित करेन असेही हुकूमदेव यांनी म्हटले आहे. ही भूमिका घेतल्याबद्धल हुकूमदेव यांनी नितीश कुमार यांचे आभारही मानले आहेत.


दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश कुमार पुन्हा एकदा वस्तू सेवा कर म्हणजेच जीएसटीचे पुन्हा एकदा समर्थन करताना दिसले. ते म्हणाले, जे लोक जीएसटीचा विरोध करतात त्यांना विचारा की, जीएसटीचा प्रस्ताव कधी आला होता. पहिल्यांदा व्हॅट आला आणि त्यानंरच जीएसटी आला असेही नितीश कुमार म्हणाले. बदल होण्यास काहीसा कालावधी जातो. त्याचा आपण स्विकार करायला हवा, असेही नितीश कुमार म्हणाले.


ज्या भाजप आणि एनडीएवर टीका करून लालू प्रसाद यांच्या साथीने बिहारमध्ये सत्तासोपान चढला. त्याच नितीश कुमारांनी लालूंसोबतच्या महाआघाडीतून बाहेर पडत भाजपच्या सावलीत विसावने पसंद केले. या निर्णयापासून नितीश यांच्या प्रत्येक राजकीय हालचाल आणि वक्तव्यावर प्रसारमाध्यमे आणि देशभरातील राजकीय अभ्यासकांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे त्यांनी उपस्थीत केलेल्या खासगी क्षेत्रात आरक्षण यामुद्द्याची चर्चा झाली नाही तरच नवल.