भाजीपाला, खाद्यपदार्थाच्या वाढत्या किंमतींमुळे जूनमध्ये महागाईचा दर ६ टक्क्यांवर
गेल्या वर्षी जूनमध्ये महागाईचा दर 3.18 टक्के होता.
नवी दिल्ली : भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थाच्या किंमती वाढल्यामुळे जूनमध्ये किरकोळ महागाई दर 6.09 टक्क्यांवर गेला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या सरकारच्या आकडेवारीनुसार अन्नधान्य महागाई गेल्या महिन्यात 7.87 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर 3.18 टक्के होता.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे, मर्यादित संख्येत बाजारातून गोळा केलेल्या आकडेवारीवर महागाईचा डेटा आधारित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जो डेटा घेण्यात आला आहे, तो राज्य स्तरावर ग्राहक मुल्य निर्देशांकचे (consumer price Index)अंदाज तयार करण्यासाठी पुरेसे निकष पूर्ण करत नाहीत. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्याचा ग्राहक मुल्य निर्देशांक अर्थात consumer price Index जाहीर करण्यात आलेला नाही.